
रत्नागिरी:
“नगरसेवक सुहेल मुकादम हे केवळ एक लोकप्रतिनिधी नसून ते तळागाळातील सामान्य माणसांसाठी धावून जाणारे ‘हाडाचे कार्यकर्ते’ आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका केवळ त्यांच्या प्रभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरात त्यांचे सामाजिक योगदान मोठे आहे. नव्या पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा,” असे गौरवोद्गार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी काढले.
‘आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना’ आणि ‘संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ’ यांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या दिमाखदार सोहळ्यात प्रभाग क्रमांक १६ चे नवनिर्वाचित नगरसेवक आणि ‘आश्रय’चे संस्थापक नगरसेवक सुहेल मुकादम तसेच प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका सौ.नाहीदा सोलकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी मुकादम यांच्या निस्वार्थी कार्याची प्रशंसा केली.
हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्य मित्र अनिता पवार यांनी शासकीय आरोग्य योजनांची माहिती दिली. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या ठिकाणीच ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयवंदना योजने’ची कार्डे काढून देण्यात आली, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या सत्काराला उत्तर देताना नगरसेवक सुहेल मुकादम भारावून गेले होते. त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना दिले. “ज्येष्ठ नागरिकांनी प्रचाराची धुरा अत्यंत कौशल्याने सांभाळली, त्यांच्या आशीर्वादामुळेच हा विजय शक्य झाला. यापुढेही शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
जयस्तंभ येथील महिला मंडळ सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला रत्नागिरीतील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. व्यासपीठावर नजीरुद्दीन वस्ता (स्टार न्यूज कोकण), सिराज खान, शौकत काझी, पत्रकार जमीर खलफे, शकील गवाणकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याच सोहळ्यात नुकताच ‘कोकणरत्न’ पुरस्कार मिळालेल्या शकील गवाणकर आणि पत्रकार जमीर खलफे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील गवाणकर यांनी केले.






