‘स्टार न्यूज़ कोकण’संपादक : शब्बीर वस्ता
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या येथील नामांकित मिस्त्री हायस्कूलच्या दोन गुणवंत शिक्षकांना रोटरी क्लबतर्फे नुकताच प्रतिष्ठेचा ‘Best Teacher Achievement Award 2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संजीदा रिझवान म्हसकर आणि पर्यवेक्षक श्री. मुश्ताक रसूल आगा यांना त्यांच्या प्रदीर्घ, उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक सेवेबद्दल हा सन्मान मिळाला आहे.
*३३ वर्षांचे शैक्षणिक योगदान आणि तंत्रज्ञानाची जोड*
श्रीमती संजीदा म्हसकर यांनी गेली ३३ वर्षे शिक्षण क्षेत्रात अविरत सेवा बजावली आहे. विषयावरील प्रभुत्व, प्रभावी अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ यामुळे त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नवनवीन ज्ञान आत्मसात करणे आणि त्याचा अध्यापनात प्रभावी वापर करणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे.
*खेळाच्या माध्यमातून संस्कार: क्रीडापटू मुश्ताक आगा यांचा गौरव*
शाळेचे पर्यवेक्षक श्री. मुश्ताक रसूल आगा हे गेली ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. एक उत्तम शिक्षक असण्यासोबतच ते राष्ट्रीय दर्जाचे कबड्डीपटूही राहिलेले आहेत. क्रीडा क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, मेहनत आणि चिकाटीचे संस्कार रुजविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
*शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा*
दोन्ही शिक्षकांच्या शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन रोटरी क्लबने दिलेला हा पुरस्कार त्यांच्या समर्पित सेवेची पावती ठरावी असाच आहे. हा क्षण मिस्त्री हायस्कूलसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.या विशेष सन्मानाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुनव्वर तांबोळी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी श्री. आगा सर आणि श्रीमती संजीदा मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
