दोहा: कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचा करिष्मा दिसून आला. काल अर्जेंटिना आणि क्रोएशियामध्ये फीफा वर्ल्ड कप 2022 सेमीफायनलचा पहिला सामना झाला. या मॅचमध्ये अर्जेंटिनाने क्रोएशियाला 3-0 ने नमवून वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. फुटबॉलच्या या खेळात लिओनेल मेस्सी का सर्वोत्तम आहे? त्याच्या खेळात काय जादू आहे? ते पुन्हा एकदा दिसून आलं.
कालच्या सेमीफायनलमध्ये मॅचमध्ये लिओनेल मेस्सी उजव्या बाजूने धावत आला. क्रोएशियाचा डिफेंडर ग्वार्डियोल त्याच्यामागे होता. सध्या सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ग्वार्डियोलची उत्तम डिफेंडरमध्ये गणना होते. ग्वार्डियोल मेस्सीला गोलपोस्ट जवळच्या बॉक्समध्ये जाण्यापासून रोखत होता. पण त्याचवेळी मेस्सीने त्याचं ड्रिबलिंगच कौशल्य दाखवलं. मेस्सी फुटबॉलच्या खेळातील जादूगार का आहे? ते पहाणाऱ्यांच्या लक्षात आलं. मेस्सीने ज्युलियन अल्वारेजकडे पास दिला. त्यानंतर अल्वारेजने दुसरा गोल करण्यात कुठलीही चूक केली नाही.