मुंबई : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आता अंतिम सामन्यासाठी अवघा आठवडा उरला आहे. स्पर्धेच्या साखळी सामन्यांचा टप्पा रविवारी संपला.
आता उपांत्य फेरीचे दोन सामने अनुक्रमे मुंबई व कोलकाता इथे रंगणार आहेत. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना आयसीसीकडून पैसे दिले जातील. क्रिकेट बोर्डाने फार पूर्वीच याबाबत घोषणा केली होती. सर्व संघांना त्यांच्या कामगिरीनुसार मोबदला द्यायचा आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघाला स्वतंत्र बक्षीस रक्कम मिळेल. या स्पर्धेचा विजेता घोषित होणाऱ्या संघाला सर्वाधिक रक्कम दिली जाईल. तर जाणून घेऊया… या स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांना किती पैसे मिळतील आणि या सामन्याचा विजेता ठरलेल्या संघाला किती पैसे मिळतील.
विजेत्या संघाची रक्कम…
ICC ने 2023 च्या विश्वचषकासाठी याआधीच बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. भारतीय रुपयात बोलायचे झाले तर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला जवळपास 33 कोटी 17 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 16 कोटी 58 लाख रुपये मिळतील. ग्रुप स्टेजनंतर बाहेर पडलेल्या संघाला 1 लाख डॉलर मिळतील.
आयसीसी हरणाऱ्या संघाचेही भरणार खिसे…
या स्पर्धेदरम्यान, प्रत्येक सामन्यादरम्यान विजेता ठरणाऱ्या संघाला त्या एका सामन्यासाठी अतिरिक्त 40,000 US डॉलर (सुमारे 33 लाख रुपये) मिळतील. सेमीफायनल आणि फायनलच्या बक्षीस रकमेबद्दल बोलायचे झाले तर, विश्वचषक विजेत्या संघाला 40 लाख डॉलर (सुमारे 33.17 कोटी रुपये) तर उपविजेत्या संघाला 20 लाख डॉलर (सुमारे 16.58 कोटी रुपये) बक्षीस मिळेल.
उपांत्य फेरीत पराभूत होणार्या दोन्ही संघांना समान आठ लाख डॉलर्स (सुमारे ६.६३ कोटी रुपये) मिळतील. सरतेशेवटी, जे संघ बाद फेरीत पोहोचू शकत नाहीत त्यांना 100,000 अमेरिकी डॉलर देखील दिले जातील.