रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात एका महिलेची रस्त्यात पडलेली पर्स परत करून कोकजे वठार (निवळी) येथील महेश नारायण कोकजे आणि मंदार महेश कोकजे या पिता-पुत्राने प्रामाणिक पणाचे दर्शन घडवले. आज (३० जुलै) सकाळी ८ ते ८.१५वाजण्याच्या सुमारास नसिरा फणसोपकर (रा. राजिवडा, रत्नागिरी)या आपली दुचाकी घेऊन मारुती मंदिर ते जयस्तंभ असा प्रवास करत होत्या. त्या माळनाका परिसरात आल्या असता त्यांची पर्स नजरचुकीने रस्त्यात पडली.यावेळी पाऊसही मुसळधार पडतअसल्यामुळे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. यानंतर काही वेळातच माळनाका येथे कोकजे स्नॅक्स सेंटर मध्ये ग्राहक सांभाळत असलेले महेश कोकजे यांचे लक्ष त्या पर्सवर गेले आणि त्यांनी तीउचलून दुकानात आणली आणि संबंधित व्यक्ती बद्दल काही माहितीमिळते का ते पाहिले. पर्समध्ये काही रक्कम, आधार कार्ड आणि मोबाईल होता; मात्र हा फोन लॉक असल्यामुळे संबंधित व्यक्तीशी संपर्क साधणे कठीण झाले. काही वेळातच नसिरा फणसोपकर यांनाआपली पर्स पडल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पर्समध्ये असलेल्या फोनवर संपर्क साधला. फोन सायलेंट मोडवर असल्याने सुरूवातीला श्री. कोकजे यांना पर्समधील फोन वाजत असल्याचे लक्षात आलेनाही; मात्र श्रीमती फणसोपकर यांनी सतत फोन लावल्यामुळे काहीवेळानंतर पर्समधील मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचे श्री. कोकजे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ फोन उचलून संबंधीत महिलेला पर्स आपल्याला मिळाले असल्याचे सांगत त्यांना दुकानाचा पत्ता दिला. पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमती फणसोपकर यांनी कोकजे स्नॅक्स सेंटर येथे येऊन पर्स ताब्यात घेतली तसेच महेश आणिमंदार या पिता – पुत्राने दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचेआभार मानले. दरम्यान, पर्समधील महिलेचा संपर्क शोधण्या साठी श्री. कोकजे यांनी सामाजिक कार्यकर्ते तन्मय दाते यांना संपर्क करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. तन्मय दाते यांनीही श्रीमती फणसोपकर यांच्याशी संपर्क होण्यासाठी मदत केली. कोकजे पिता-पुत्राने दाखविलेल्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होतआहे.