मुंबई:
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
परीक्षेची सुरवात त्याच तारखेला होणार आहे, पण काही विषयांचे पेपर स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा ‘सीबीएसई’च्या पेपरवेळी आहेत का, याची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बारावीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेची तयारी करता येणार आहे. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया देखील वेळेत सुरु करता येणार आहे. याशिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा देखील वेळेत घेता येईल आणि त्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश देखील मिळणे सोयीचे होणार आहे. श्रेणी सुधारसाठी देखील विद्यार्थ्यांला लवकर संधी मिळेल व पुढील प्रवेश त्यांचाही सोयीस्कर होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी परीक्षा पूर्वीपेक्षा १० दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकावर विद्यार्थी, पालकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर केवळ ४० हरकती तथा सूचना बोर्डाला प्राप्त झाल्या असून त्याही किरकोळ स्वरुपाच्या असल्याने बोर्डाने तेच वेळापत्रक अंतिम करण्याचा निर्णय घेतल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
असे असणार परीक्षांचे वेळापत्रक
इयत्ता बारावी
प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत
लेखी परीक्षा : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च
—————————————–
इयत्ता दहावी
प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत
लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च
स्थानिक सुट्या अन् ‘सीबीएसई’च्या तारखांची पडताळणी
पुणे बोर्डाने दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु करायची हे यापूर्वीच निश्चित केले आहे. आता फक्त पहिल्या पेपरनंतर होणाऱ्या पेपरसाठी स्थानिक सुट्या (लोकल हॉलीडे) व ‘सीबीएसई’च्या परीक्षेच्या तारखांची काही अडचण आहे का, याची पडताळणी केली जात आहे. विभागीय मंडळांकडून त्यासंबंधीची माहिती मागविण्यात आली असून पुढील १५ दिवसांत बोर्डाकडून अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल