देवरुख :
गाव विकास समितीकडून चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तरुणांना नोकऱ्यांसाठी एमआयडीसी, आरोग्यासाठी हॉस्पिटल, शेती विकास व बंद पडणाऱ्या शाळां, ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारणे याबाबत गॅरेंटी देणारा जनतेशी करारनामा प्रकाशित करण्यात आला. अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे,उमेदवार अनघा कांगणे, सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे एडवोकेट सुनील खंडागळे यांच्या उपस्थितीत हा करारनामा प्रकाशित करण्यात आला.
गाव विकास समितीचा उमेदवार या करारनाम्या अंतर्गत निवडून आल्यानंतर जनतेशी बांधील असेल असे संघटनेमार्फत सुहास खंडागळे यांनी सांगितले.निवडणूक काळात होणारा पैशांचा वारेमाप वापर हा गावांच्या विकासाला मारक असल्याचे सांगत आमचा लढा गावांच्या भविष्यासाठी आहे असे प्रतिपादन यावेळी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख खंडागळे यांनी केले. गाव विकास समिती लोकांच्या ज्या गरजा आहेत त्याच मुद्द्यांच्या आधारे निवडणूक लढत आहे.हॉस्पिटल, रोजगार, शिक्षण,शेती विकास व दर्जेदार रस्ते हेच मुद्दे येथील जनतेसाठी महत्त्वाचे असून यामुळे गावांचे भविष्य टिकणार आहे. गावांचे भविष्य टिकवण्यासाठी यावेळी जनतेने गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांना विजयी करावे असे आवाहनही सुहास खंडागळे यांनी यावेळी केले. गाव ओस पडतायेत, तरुणांना रोजगार नाही, वेळेवर औषध उपचार मिळत नाहीत, शेती विकासाबाबत धोरण नाही, बंद पडणाऱ्या शाळाबाबत ठोस भूमिका नाही परिणामी यावेळी जनतेने नेत्यांसाठी मतदान न करता स्वतःसाठी मतदान करावे व गाव विकास समितीचा उमेदवार निवडून द्यावा असे आग्रही आव्हान सुहास खंडागळे यांनी यावेळी केले.
प्रचाराबाबत गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सभा, रोड शो यावर भर न देता घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर आमचा भर असून गाव विकास समितीची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
जनतेने गाव विकासाचा उमेदवार निवडून दिल्यास, निवडून येणाऱ्या आमदारांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांची समिती नियुक्त करण्यात येईल व आश्वासन पूर्ण न झाल्यास त्याचा राजीनामा घेण्याचा अधिकार या नागरिकांच्या कमिटीला दिला जाईल असे या करारनाम्याच्या प्रकाशन प्रसंगी सुहास खंडागळे यांनी सांगितले.
यावेळी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे, गाव विकास समितीच्या चिपळूण संगमेश्वर उमेदवार अनघा कांगणे, सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे, एडवोकेट सुनील खंडागळे आधी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.