नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा मेगा लिलावात अनेक नवनवीन रेकॉर्ड झाल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडूचा नवा विक्रम भारतीय फलंदाज ऋषभ पंतच्या नावावर जमा झाला.
तर, दुसरीकडे अनेक नामांकित चेहरे हे अनसोल्ड राहिले. पण यावेळी सोमवारी (25 नोव्हेंबर) चर्चेत आला एक 13 वर्षाचा सर्वात तरुण खेळाडू, ज्याने पहिल्यांदाच 30 लाखांच्या बेस प्राईज वर तब्बल 1.10 कोटींची कमाई केली आहे. तसेच, आयपीएलच्या इतिहासात कोटींची रक्कम घेऊन जाणारा तो पहिलाच तरुण खेळाडू ठरला आहे.
यंदाच्या लिलावात वयाच्या 13व्या वर्षी बिहारच्या वैभव सूर्यवंशी याच्यावर 1 कोटी 10 लाख एवढी रक्कम मिळाली आणि तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण करोडपती खेळाडू बनला. तो बिहारचा रहिवासी असून देशांतर्गत स्पर्धांमध्ये तो बिहार संघाचे प्रतिनिधित्व करतो. या मोसमात वैभवने बिहारकडून रणजी सामना खेळला होता. आत्तापर्यंत त्याने 5 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 100 धावा केल्या असून त्याने आतापर्यंत एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलेले नाही. वैभवने आतापर्यंत एक टी-20 सामना खेळला असून त्यात त्याने 13 धावा केल्या आहेत.
वैभवने मागील एक वर्षामध्ये क्रिकेटच्या विविध स्तरांवर एकूण 49 शतके आणि 3 द्विशतके झळकावली. गेल्या वर्षी त्याने हेमन ट्रॉफी लीग आणि सुपर लीगमध्ये सर्वाधिक 670 धावा केल्या. यामध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये विनू मांकड स्पर्धेच्या 19 वर्षांखालील संघात वैभवची निवड झाली होती. चंदीगड येथे झालेल्या स्पर्धेत त्याने बिहारसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 393 धावा केल्या होत्या ज्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.