दुबई : भारताने न्यूझीलंडला धुळ चारत त्यांचा विजयरथ रोखला. भारताने न्यूझीलंडवर साकारलेल्या विजयामुळे सेमीफायनलध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने दमदार फलंदाजी करत २४९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला खरा, पण भारताच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले.
केन विल्यम्सन यावेळी न्यूझीलंडकडून एकाकी झुंज देत होता. पण केनला अक्षर पटेलने ८१ धावांवर बाद केले आणि भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारताने या सामन्यात ४४ धावांनी विजय साकारत गटात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता भारताचा सामना हा ऑस्ट्रेलियाबरोबर होईल, तर न्यूझीलंडला दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. भारताच्या डावाची भन्नाट सुरुवात रोहित शर्माने केली होती. पहिल्याच षटकात त्याने चौकार लगावला होता. पण यावेळी १५ धावांवर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीदेखील ११ धावांवर बाद झाला आणि भारताची ३ बाद ३० अशी अवस्था झाली होती. पण त्यावेळी श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी ९७ धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचली आणि संघाला सावरले. पण अक्षरला यावेळी अर्धशतक झळकावता आले नाही, तो ४१ धावांवरर बाद झाला. पण श्रेयस अय्यरने मात्र त्यानंतर अर्धशतक झळकावले.
श्रेयसने यावेळी ७५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण यावेळी विल यंगने अप्रतिम झेल पकडत श्रेयसला माघारी धाडले. श्रेयसने यावेळी ९८ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७९ धावांची खेळी साकारली. श्रेयस बाद झाल्यावर हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांत जलदगतीने धावा जमवण्याचा प्रयत्न केला. हार्दिकने यावेळी चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४५ धावा केल्या. हार्दिकच्या या फटकेबाजीमुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना २४९ धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने यावेळी पाच विकेट्स मिळवत भारताला जोरदार धक्के देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या २५० धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला भारताने ठराविक फरकाने धक्के दिले. पण यावेळी भारताच्या विजयाच्या मार्गात सर्वात मोठा अडसर होता तो केन विल्यम्सन. केनने अर्धशतक झळकावत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण अक्षर पटेलने अखेर केनला बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला.