मुंबई:
उन्हाळी सुट्टीला सुरुवात होताच अनेकजण आपला परिवार किंवा मित्रमंडळासह बाहेरगावी फिरायला जातात. यावेळी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेस ११ एप्रिल ते २३ मे २०२५ या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी १२ एप्रिल ते २४ मे या कालावधीत करमाळी येथून सुटणार आहे. ही गाडी करमाळी येथून दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, रोड, कणकवली, सिंधुुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी या स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीचे एकूण २२ एलएचबी तसेच संपूर्ण वातानूकुलित असेल. यातील लो. टिळक टर्मिनस ते करमाळी या फेरीसाठीचे आरक्षण आजपासून म्हणजेच ८ एप्रिल पासून खुले झाले आहे.