Saturday, April 19, 2025
HomeNewsरत्नागिरी शहरात भरदिवसा वृद्ध महिलेचे दागिने लांबवले

रत्नागिरी शहरात भरदिवसा वृद्ध महिलेचे दागिने लांबवले

रत्नागिरी : शहरातील गजबजलेल्या 80 फुटी हायवे परिसरात भरदिवसा दोन अज्ञात व्यक्तींनी एका वृद्ध महिलेला पोलिस असल्याची बतावणी करत तिच्याकडील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. ही धक्कादायक घटना मंगळवार, 8 एप्रिलरोजी दुपारी 2.15 वा. सुमारास घडली.
रशिदा रशिद साखरकर (70, मूळ रा. राजापूर नाणार इंगलवाडी,सध्या रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तक्रारदार रशिदा साखरकर आज दुपारी पेठकिल्ला येथील आपल्या घरातून मांडवी येथे नातेवाईकांकडे औषध आणण्यासाठी जात होत्या. 80 फुटी हायवे येथील भूते नाक्याजवळ असताना पांढऱ्या रंगाच्या दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून पुढे चोरी झाली असून एका तरुणाच्या गळ्यातील चेन चोरीला गेली आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून आमच्या कडील कागदामध्ये टाका, असे सांगितले.
अज्ञात व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रशिदा साखरकर यांनी त्यांच्या अंगावरील खोट्या दागिन्यांसोबत खरे सोन्याचे कानातील14 ग्रॅम वजनाचे अंदाजे 60 हजार रुपये किमतीचे कानातले वसाखळ्या काढून त्या कागदामध्ये ठेवल्या. त्यानंतर त्या संशयितांनी चलाखी करत दुसऱ्याच कागदाची पुडी त्यांच्या हातात देऊन तेथून त्वरित पळ काढला.
घरी पोहोचल्यानंतर रशिदा साखरकर यांनी ती पुडी उघडून पाहिली असता, त्यांना त्यात प्लास्टिकच्या बांगड्या आणि दगड दिसले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ आपल्या मुलाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.पोलिसांनी या घटनेची नोंद करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मिरकरवाडा येथेजमावाने भरदिवसा चौघांना मारहाण केली होती. तसेच, शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि त्याची विक्री करणारे संशयितसतत पोलिसांच्या हाती लागत आहेत. अशा परिस्थितीत आता भरदिवसा गजबजलेल्या वस्तीत एका वृद्ध महिलेचे दागिने चोरी लागेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular