Friday, April 18, 2025
HomeNewsनिढळेवाडी येथे इर्टिगाची सुमोला धडक; ११ जण जखमी

निढळेवाडी येथे इर्टिगाची सुमोला धडक; ११ जण जखमी

संगमेश्वर:

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर निढळेवाडी येथे टाटा सुमो आणि इर्टिगा या दोन चारचाकी वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवाशांपैकी काहींना किरकोळ तर काहीना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची घटना निढळेवाडी येथील राजश्री पेट्रोल पंपासमोर सायंकाळी 6.15 च्या सुमारास घडली.

शिशिर शांताराम सावंत (वय 49) राहणार कीर्ती नगर हे त्यांच्या मालकीच्या असलेल्या टाटा सुमो (MH46X/0441) ह्या चारचाकी वाहनाने रत्नागिरी येथून चिपळूण तालुक्यात येणाऱ्या वहाल येथे भरणाऱ्या आठवडा बाजारात मच्छि विकणाऱ्या रत्नागिरी मिरकरवाडा येथील महिलांना घेऊन गेला होता. संध्याकाळी बाजार आटोपल्यावर त्या मासे विकणाऱ्या महिलांना घेऊन रत्नागिरी येथे परतीच्या मार्गांवर येत असताना संगमेश्वर एसटी स्टॅन्डपासून सुमारे दोन ते तीन की. मी. अंतरावर असलेल्या मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील निढळेवाडी येथील राजश्री पेट्रोल पंपासमोर आले असता गोव्याच्या दिशेहुन सुसाट वेगात येणाऱ्या (MP09ZX/0230) इर्टिगा चारचाकी घेऊन येणारा चालक दीपक पंढरी आर्से (वय 23) राहणार भरगोंन,मध्यप्रदेश चुकीच्या दिशेने येत सुमोला जोरदार धडक दिली.

वेगात व चुकीच्या बाजूने येत सुमो चारचाकी वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत सुमो चारचाकी वाहन रस्त्यावर पलटी होत पुन्हा रस्त्यावर जशीच्या तशीच उभी राहिली तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहूनच अपघाताची भीषणता लक्षात येते.अपघात घटना घडल्यावर स्थानिक तसेच वाहनचालकांनी पुढे होत दोन्ही वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत सुरु केली एवढ्यातच संगमेश्वर पोलिसांचे पथक सुद्धा हजर झाले त्यांनीही हातभार लावला. रस्त्या च्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अपघातातील दोन्ही गाड्या बाजूला करून वाहतूक कोंडी सोडवली.

या अपघातात सुमो वाहनातील जुलेखा आलिमियाँ तांडेल (वय 50), बेबीनाज अल्लाउद्दीन मुकादम (वय 60), हसीना लियाकत कोतवडेकर (वय 50),राबिया आलिमियाँ राजपूरकर (वय 50) सर्व राहणार मिरकरवाडा (रत्नागिरी ) सुमो चालक शिशिर शांताराम सावंत (वय 50) कीर्तीनगर रत्नागिरी, तर इरटीका वाहनातील दीपक पंढरी आर्से (वय 23- चालक ),योगेश उमाकांत गरदे वय 48,लता उमाकांत गरदे (वय 69),मुदिता योगेश गरदे (वय 42),उमाकांत रामचंद्र गरदे (वय 78),आराध्या योगेश गरदे (वय 11 वर्ष, सर्व राहणार भरगोंन, मध्यप्रदेश) यातील काहींना किरकोळ दुःखापत तर काहींना गंभीर दुखापत व रक्तस्त्राव झाले असून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी अभिजित मोरे यांनी या सर्वावर प्राथमिक उपचार केले. तर गंभीर दुखापत झालेल्या चौघावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular