रत्नागिरी :
रत्नागिरीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या ६,१५२ दोषी वाहनांवर कारवाई करून २,६०,७३,००० रुपयांचा दंड, वसूल केला आहे. तर मोबाइलवर संभाषण करत वाहन चालविणाऱ्या ३६८ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नियमितपणे वाहनांची तपासणी केली जाते आणि तपासणीदरम्यान दोषी वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. या कार्यालयामार्फत सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात एकूण ६,१५२ दोषी वाहनांवर कारवाई करून २,६०,७३,००० रुपयांचा दंड, तसेच ७७,३६,००० रुपये कर वसूल केला आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या ४९ स्कूल बसवरही कारवाई करण्यात आलेली आहे.
सर्वाधिक दंड वसुली मालवाहू ट्रक, टिप्पर, ट्रेलर आदी वाहनांकडून केली आहे. ३९५ ओव्हरलोड वाहनांकडून १ कोटी ११ लाख १५ हजार, तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या ३१७ प्रवासी बस, रिक्षा यांच्याकडून ३० लाख २५ हजार इतकी दंड वसुली करण्यात आलेली आहे. ४९ दोषी स्कूल बस वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.