सांगली: (दि.२७ जुलै मुराद पाटणकर)
सांगली इस्लामपूरच्या राजरामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बैलगाडी साठी बनवले खास ‘रोलिंग सपोर्टर’
बैल हा नेहमी कामाला जुंपलेला प्राणी आहे. शेतीबरोबरच बैलगाडी ओढण्यासाठी त्याचा सतत वापर होत असतो.अनेकदा बैलांच्या क्षमते पलिकडे बैलगाडीत ओझे लादले जोते. याचा मोठा भार बैलांच्या मानेवर येत राहतो . अनेकदा दुखापती होतात, अपघात होतात. बैलांवरील या अत्याचारा विरोधात अनेकदा प्राणि प्रेमींनी आवाजही उठवलेला आहे. मात्र, तरीही बैलांच्या मानेवरील ओझे कमी झालेले दिसत नाही. मात्र, अतीभारामुळे वाकलेल्या बैलाच्या मानेवरील ओझे आता खरेच कमी होणार आहे. याचे कारण म्हणजे इस्लामपूरच्या राजरामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सारथी ही विशेष बैलगाडी तयार केली आहे. या बैलगाडीला रोलिंग सपोर्ट देण्यात आला असून त्यामुळे बैलांच्या मानेवरील ओझे हलके होणार आहे.
उसाचा गाळप हंगाम सुरू झाला की, राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर ऊस वाहतुकी साठी बैलगाड्या धावताना पाहायला मिळतात. ऊसाचा प्रचंड डोलारा बैलांची जोडी आपल्या खांद्यावर घेऊन जात असल्याचे चित्र पाहून अनेक वेळा बैलांवर अत्याचारा होत असल्याची चर्चा होते. हजारो किलोच्या उसाची वाहतूक करताना अनेक वेळा बैल खड्ड्यातून जाताना बैलगाडी उलटणे, बैलांना गंभीर दुखापत होणे, पाय मोडणे अशा घटना वारंवार घडतात. यावर प्राणि मित्रांच्या कडूनही अनेक वेळा बैलांवरील मानवी अत्याचारा बाबत आवाज उठवला जातो.पण त्यांच्या वरील ओझे कमी कसे होईल याबाबत काहीच होत नाही. मात्र बैलांच्यावर होणारे हे अत्याचार आणि ओझे कमी करणारा यशस्वी प्रयोग इस्लामपूरच्या राजारामबापू पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना करून दाखवला आहे.
राजरामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले,आकाश गायकवाड,ओंकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी बैलांच्या मानेवरील ओझं कमी करण्याच्या दृष्टीने “सारथी”हा प्रकल्प हाती घेतला. त्यातून बैलगाडीमध्ये बैलांना जुपण्यासाठी असणाऱ्या त्यांच्या खांद्यावरील जूच्या बरोबर काही, तर नव्या कल्पनातुन बैलांवर पडणारे ओझे कसं कमी होईल, याचा विचार करताना “रोलिंग सपोर्ट”हा पर्याय त्यांच्या समोर आला. यातून या विद्यार्थ्यांनी, त्या दृष्टीने टायर आणि इतर साहित्यांच्या माध्यमातून हा”रोलिंग सपोर्ट”बनवला. त्याचा प्रयोग देखील उसाच्या वाहतुकीसाठी करणाऱ्या एका बैलगाडी मध्ये केला आणि तो यशस्वी देखील झाला.
बैलगाडीच्या मध्ये हे रोलिंग सपोर्ट लावून बैलगाडी मध्ये ऊस भरण्यात आला. त्यानंतर बैलाच्या मानेवर जूसोबत रोलिंग सपोर्ट जोडण्यात आला. यामुळे बैलांच्या मानेवर असणारे ओझे कमी होऊन बैलांना बैलगाडी ओढणे सहज शक्य असल्याचे समोर आले. यामुळे बैलांच्या खांद्यावर व मानेवर असणारे ओझे हलके देखील झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बैलगाडी चालकांना देखील हे रोलिंग सपोर्टर बैलांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. या रोलिंग सपोर्टरमुळे बैलांना आता एक मोठा आधार मिळणार आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चालकांना देखील याचा फायदा होऊन बैलांना होणाऱ्या इजा आणि दुखापत टाळने देखील शक्य होणार आहे. तसेच बैलांच्या वरील ओझे आणि अत्याचार देखील कमी होतील, असे मत विद्यार्थ्यांचे आहे. आता या रोलिंग सपोर्टच्या पेटंट साठी विद्यार्थ्यांनी अर्ज देखील केला आहे.