रत्नागिरी :
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प अंतर्गत लोकनृत्य व भूमिका अभिनय विभागीय स्पर्धेत रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाचे स्कीट प्रथम आले आहे . आता दामले विद्यालय नोव्हेंबर माहिन्यात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणार आहे. याचबरोबर शाळेचा लोकनृत्य स्पर्धेतही विभाग स्तरावर तिसरा क्रमांक आला आहे .
या विभागस्तरीय स्पर्धा कोल्हापूर येथे काल पार पडल्या. यावेळी रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या संघांनी लोकनृत्य आणि भूमिका अभिनय या दोन प्रकारात आपली कला सादर केली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व दामले विद्यालयाने केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत भूमिका अभिनय (स्कीट ) सादरीकरणात दामले विद्यालयाच्या श्री. योगेश कदम लिखित वैयक्तिक सुरक्षा या स्कीटला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या स्किटचे दिग्दर्शन शाळेचा माजी विद्यार्थी शाहबाज गोलंदाज याने केले .
याचबरोबर लोकनृत्य स्पर्धेत शेतकरी नृत्य सादर करत विद्यालयाने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे . या सादरीकरणासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली .
विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे दामले विद्यालय आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पुणे येथील राज्यस्तरीयस्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणार आहे . शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री . भागवान मोटे, प्रशासन अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ यांनी कौतुक केले आहे . कोल्हापूर विभागाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री . एकनाथ आंबोकर यांनी त्यांच्या दालनात यशस्वी स्पर्धकांचे विशेष कौतुक केले आहे .