देवरुख (दि.30 नोव्हेंबर) : ग्रामीण भागातील सामान्य लोकांत पंचायत राजबाबत आजही जनजागृती झालेली दिसत नाही.जलजीवन मिशन अंतर्गत योजना या काही ठिकाणी पैसे कमाओ योजना होत आहेत,पाणी प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देण्याऐवजी अंदाजपत्रके अवास्तव वाढवली जात आहेत.त्याकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थाने लोकांच्या घराघरात पाणी कसे पोहचेल याकडे जिल्ह्याची पालक संस्था म्हणून जिल्हापरिषद प्रशासनाने पाहिले पाहिजे असे वक्तव्य गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी लोकशाही मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले.
संविधान दिन सोहळा व गाव विकास समितीच्या चौथ्या लोकशाही मेळाव्याला मार्गदर्शन करताना सुहास खंडागळे म्हणाले की,73 व्या घटना दुरुस्ती नुसार ग्रामपंचायत आणि ग्रामसभांना जे अधिकार मिळाले आहेत ते दुर्दैवाने आजही गावातील सामान्य नागरिकांना माहीत नाहीत,लोकांना माहीत होऊ दिले जात नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती,ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सरकारी योजना राबविल्या जात असतात मात्र या संस्थांच्या ठिकाणी बसलेले लोकं लोकाभिमुख कारभार करण्यात अपयशी ठरत असल्याने ग्रामीण भागात सर्वसामान्य लोकांचा विकास रखडला आहे.सामान्य माणसाने आपले हक्क अधिकार समजून घेऊन आता स्वतः यंत्रणेला जाब विचारायला शिकले पाहिजे.किती दिवस,ग्रामसेवक, तलाठी,पोलीस ठाणे ,जिल्हा परिषद येथे जनतेच्या सेवेसाठी बसवलेल्या लोकांना आपण साहेब साहेब म्हणून आपल्याच हक्क अधिकारांचे अवमूल्यन करणार आहोत?कधीतरी त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की नाही?असा सवाल करत आपणच लोकशाहीत मालक आहोत ही भावना सामान्य लोकांनी जपली पाहिजे असे सुहास खंडागळे यावेळी बोलताना म्हणाले.आरोग्य,शिक्षण आणि पाणीपुरवठा या मूलभूत सोयीसुविधा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने पुरवायच्या असतात मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामीण भाग अविकसित राहिला आहे,गावातून स्थलांतर वाढले आहे.मराठी शाळांची दयनीय अवस्था व्हायला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे तेव्हा लोकांनी आता जागे होऊन प्रश्न विचारले पाहिजेत असे आवाहन खंडागळे यांनी यावेळी केले.यावेळी अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव,सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते,डॉ.अक्षय फाटक,हरिश्चंद्र बंडबे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गाव विकास समिती मार्फत ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांना मायेची साडी व प्रमाणपत्र देऊन स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याशिवाय 10 सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धेत प्रथम विजेते शैलेश सुरेश जाधव व द्वितीय एकता घवाळी यांनाही रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला संविधान व लोकशाही प्रेमी जनतेने मोठया संख्येने उपस्थित लावली होती.यावेळी संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे,उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे,सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे,सुरेंद्र काब्दुले, उपजिल्हाध्यक्ष मुझम्मील काझी,जिल्हा संघटक मनोज घुग,रत्नागिरी तालुका संघटक सुकांत पाडाळकर,संगमेश्वर तालुका कार्याध्यक्ष अमित गमरे,संगमेश्वर तालुका सरचिटणीस दैवत पवार,महिला संघटना अध्यक्षा दिक्षा खंडागळे, उपाध्यक्षा अनघा कांगणे,महिला सदस्या उज्मा मापारी,पूजा घुग,श्रुती खंडागळे, महेंद्र घुग सर,नितीन गोताड,वैभव पवार,दिनेश गोताड,अमित गोताड,शुभम गोरुले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.