मुंबई (29 नोव्हेंबर): धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला आहे. सिक्सरचा बादशाह युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढत ऋतुराज गायकवाडने 6 चेंडूत 7 षटकार ठोकत भीम पराक्रम केला आहे.
ऋतुराजच्या वादळी खेळी समोर विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यातील 49 व्या षटकात ऋतुराजनं उत्तर प्रदेशचा गोलंदाज शिवा सिंहच्या गोलंदाजीवर सात षटकार ठोकून इतिहास रचला. यासह उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंहच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झालीय. आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजीच्या गोलंदाजीवर सात षटकार मारले गेले नाहीत. तसेच एका षटकात सात षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
शिवा सिंह हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. शिवा भारताच्या अंडर-19 संघाचाही भाग आहे. त्यानं पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषकही जिंकला आहे. 2018 च्या अंडर-19 विश्वचषकात शिवानं 6 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचबरोबर या विश्वचषकात तो खूपच किफायतशीर ठरला. विश्वचषकादरम्यान त्यांची इकोनॉमी केवळ 3.23 इतकी होती. 23 वर्षीय शिवा सिंहनं 2018-19 मध्ये उत्तर प्रदेशसाठी लिस्ट ए क्रिकेटचा पहिला सामना खेळला होता.
ऋतुराज गायकवाडनं शिवा सिंहला एका षटकात सात षटकार ठोकले. या षटकात त्यानं नो बॉलसह एकूण सात चेंडू टाकले. या सातही चेंडूवर ऋतुराजनं सलग सात षटकार मारून इतिहासाला गवसणी घातली. एका षटकात सात षटकार तसेच एका षटकात 43 धावा ठोकणारा ऋतुराज गायकवाड जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.