२००६ ते २०१३ या कालावधीत ICC च्या खास पॅनेलचा भाग असलेले माजी पाकिस्तानी पंच असद रौफ (६६ वर्षां) यांचे लाहोर मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याबद्दल पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी ट्विट करून माहिती दिली. ‘असद रौफ यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. केवळ एक चांगला पंच नव्हे तर त्यांच्या मिश्किल व मस्तमौला स्वभावाने प्रत्येक भेटीत माझ्या चेहऱ्यावर हास्य कायम असायचे’ असे म्हणत रमीज राजा यांनी असद रौफ यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रमीज राजा यांच्यासह अन्यही पाकिस्तानी क्रिकेट क्षेत्रातील दिग्जजांनी असद रौफ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रौफ यांनी ६४ कसोटी, १३९ एकदिवसीय सामने, २८ टी-२० आणि ११ महिला टी २० सामन्यांमध्ये पंच किंवा टीव्ही पंच म्हणून काम केले. तसेच आयपीएल सामन्यांसह ४० प्रथम श्रेणी सामने, २६ लिस्ट ए सामने अशा एकूण ८९ टी-२० सामन्यांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते.