भारतीय महिला क्रिकेट संघाने बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारलेली आहे. आज भारताचा पहिल्या उपांत्य सामना इंग्लंडशी होईल.ऍजबस्टनच्या मैदानावर भारतीय प्रमाणवेळे नुसार दुपारी ३.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्या पूर्वी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांनी अंतिम एकादश मध्ये काही बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारतीय महिला संघ एक प्रगतशील संघ असल्याचे सांगत येत्या काही सामन्यांमध्ये संघात विभिन्न संयोजन पाहायला मिळतील, असे संकेत पोवार यांनी दिले आहेत.उपांत्य सामन्याच्या पूर्वसंध्येला पोवार म्हणाले की, “आम्ही एक प्रगतशील संघ आहोत, ज्यामुळे आमच्या प्रक्रियेत आणि योजनांमध्ये सातत्याने बदल होतील. आम्ही संघाकडून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”बार्बाडोसविरुद्धच्या ‘करा वा मरा’ सामन्यात जेमिमाह रोड्रिगेजने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५६ धावांची खेळी केली होती. तिच्या याच खेळीने भारतीय संघाला बार्बाडोसवर १०० धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना पोवार म्हणाले की, “आम्हाला असे वाटले की, जेमी यासाठी तयार होती. कारण ती इंग्लंडमध्ये काही खेळली होती. त्यामुळे आम्ही जोखिम घेण्याचा विचार केला होता.”