वर्दीतील माणुसकी! दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या पालकांना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मायेचा आधार

Shabbir Vasta
2 Min Read

कायद्याच्या कडक वर्दीमागे संवेदनशील मन; एसपी नितीन बगाटे यांनी सावरल्या उध्वस्त झालेल्या भावना

रत्नागिरी : क्रिकेटच्या मैदानावर भविष्य घडवण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या दोन अल्पवयीन खेळाडूंचा कोळंबे येथील पाणवठ्यात बुडून झालेला मृत्यू मन सुन्न करणारा ठरला आहे. या दुर्दैवी घटनेने अवघा परिसर शोकसागरात बुडाला आहे. 
कल्याण क्रिकेट अकॅडमीचे शुभम यादव आणि सौरभ झा या दोघांचा वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. क्रिकेटच्या माध्यमातून भविष्य घडवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या मुलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा असह्य आघात झाला आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. 


पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन
या घटनेची माहिती घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन दोन्ही मुलांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना धीर देताना बगाटे यांच्यातील संवेदनशील अधिकारी पुन्हा एकदा दिसून आला. आपल्या काळजाच्या तुकड्यांना गमावल्याचे दुःख सहन करणे कुटुंबियांसाठी असह्य झाले होते. बगाटे यांच्यासमोर आपल्या भावनांना आवर घालणेही त्यांना शक्य झाले नाही. अश्रूंना वाट मोकळी करून देत कुटुंबिय कोसळले. त्या दुःखद क्षणी बगाटे यांनी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. 


वर्दीमागील संवेदनशील मनाचे दर्शन
कार्यालयीन औपचारिकतेच्या चौकटीत न अडकता, कोणालाही पूर्वकल्पना न देता स्वतः रुग्णालयात पोहोचून दुःखात बुडालेल्या कुटुंबियांना धीर देण्याची त्यांची कृती लक्षवेधी ठरली आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मुलांना गमावलेल्या पालकांच्या अश्रूंना शब्दांनी थोपवता येत नसले, तरी अशा कठीण प्रसंगी त्यांच्या जवळ उभे राहणे हा माणुसकीचा मोठा आधार असतो. पोलीस अधीक्षक बगाटे यांनी आपल्या उपस्थितीतून तो आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. 
     कर्तव्य बजावताना कायद्याची कठोर अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांच्या वर्दीमागेही माणुसकीची भावना असते, याची जाणीव अशा प्रसंगांतून होते. संकटाच्या आणि दुःखाच्या क्षणी पीडित कुटुंबियांपर्यंत स्वतः पोहोचून त्यांचे सांत्वन करणे, ही केवळ औपचारिक भेट न राहता माणुसकीच्या नात्याने दिलेला आधार ठरतो. बगाटे यांच्या या भेटीतून त्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडले असून पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेबरोबरच त्यामागील मानवी संवेदनाही अधोरेखित झाल्या आहेत. 

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *