शिरगाव (विशेष प्रतिनिधी):
ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी १ बिट कोतवडे १ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव येथे ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘पोषण माह अभियान’ कार्यक्रम ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचा प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला, त्यानंतर उपस्थितांचे सहर्ष स्वागत करण्यात आले.
अंगणवाडी व आरोग्य सेविकांचे कार्य कौतुकास्पद : मा. श्रद्धा मोरे
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मा. श्रद्धा मोरे मॅडम यांनी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “या सर्व सेविका घराघरात जाऊन शासनाच्या लोककल्याणकारी योजना पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिलांना मुलांच्या आहाराविषयी मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत शिरगावच्या प्रथम नागरिक मा. सरपंच फरीदा काझी मॅडम यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सदस्य मा. साक्षी कुमठेकर मॅडम यांनी पोषण माह अभियान व सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय योजनांची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. ‘नवचेतना आणि आधारशीला’ उपक्रमाच्या कोकण विभाग समन्वयक मा. दीपिका मयेकर यांनी उपक्रमाची माहिती दिली, तर ग्रामविकास अधिकारी मा. उल्हास कोळी यांनी सेवा संकल्प अभियानाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मा. मुलानी सरांनी ‘पंचायत राज अभियान’ अंतर्गत ‘सबकी योजना सबका विकास’ बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आरोग्य तपासणी व स्टॉल
कार्यक्रमा दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे मार्फत विशेष हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते गरोदर मातांना ‘बेबीकेअर किट’चे वितरण करण्यात आले. स्थानिक महिलांनी पोषक घटकांनी समृद्ध असलेले विविध खाद्यपदार्थ बनवून आकर्षक स्टॉल लावले होते. समाज प्रबोधनाचा संदेश देण्यासाठी विश्वकन्या लाड आणि मानसी ठोंबरे या दोन मुलींनी काढलेल्या जनजागृतीपर रांगोळ्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.
भव्य उपक्रमाला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरगाव ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ. ममता मनोहर गावडे यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले.
या कार्यक्रमाला उपसरपंच मा. मिलिंद बाणे, ग्रामपंचायत सदस्य मयुर सांडीम, स्नेहा भरणकर, अंकिता सनगरे, ब्लड तपासणी तज्ञ नेहा जाधव, आरोग्य सेविका सुषमा पुगावकर, रूपाली पोळेकर, साक्षी माने, आरोग्य सेवक विवेक गावडे, नंदकुमार गायकवाड यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, महिला, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

