रत्नागिरी (प्रतिनिधी):
शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी केली आहे. पावसाची उघडीप आणि प्रसन्न वातावरणामुळे गणपतीपुळे, आरे-वारे, नेवरे, गुहागर आणि दापोलीच्या किनाऱ्यांवर पर्यटकांचा राबता वाढला असून शुक्रवारी दिवसभरात गणपतीपुळे मंदिरात २५ हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
विकेंडच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच पर्यटकांचा ओघ कोकणाकडे सुरू होता. सायंकाळच्या वेळी आरे-वारे किनाऱ्यावर मावळता सूर्य पाहण्यासाठी नवविवाहित दांपत्ये आणि तरुणाईची मोठी उपस्थिती दिसून आली.
समुद्र खवळलेला; सुरक्षारक्षकांचे आवाहन दुर्लक्षित
सध्या दुपारच्या वेळी किनारपट्टीवर हलका वारा वाहत असून समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. भरतीच्या वेळी समुद्रात अचानक भोवरे तयार होत असल्याने धोका वाढला आहे. अशा स्थितीतही अनेक पर्यटक धोका पत्करून उंचावलेल्या लाटांचा आनंद घेण्यासाठी थेट समुद्रात उतरत आहेत.
स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ आणि जीवरक्षकांकडून पर्यटकांना सुरक्षिततेबाबत सतर्क केले जात आहे आणि पाण्यात न उतरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, अनेक पर्यटक या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने जीवरक्षक आणि स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अलोट गर्दी
Leave a Comment
