शिरगांव (प्रतिनिधी):
एकात्मिक बालविकास प्रकल्प रत्नागिरी अंतर्गत बिट कोतवडे १ मधील ग्रामपंचायत शिरगांव येथील अंगणवाडी केंद्र शिरगांव मयेकरवाडी येथे सेवा संकल्प अभियान, पोषण माह अभियान, एकात्मिक बालविकास सेवा योजना दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्कर्ष नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन शाम मयेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर अंगणवाडी सेविका ममता मनोहर गावडे यांच्या उपस्थितीत पालक सभा, बालसभा आणि किशोरवयीन मुलींची विशेष सभा पार पडली. या प्रसंगी उपस्थित किशोरवयीन मुलींची वजन व उंचीची नोंद घेण्यात आली. अंगणवाडी सेविका ममता गावडे यांनी मुलींना सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहार, आरोग्यविषयक काळजी, सायबर सुरक्षा, चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक आणि पोषण माह अभियानाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच ‘नवचेतना आधारशिला गट’ या उपक्रमाबाबतही उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमा दरम्यान बालसखी आर्या अमोल मयेकर हिचे पुष्प देऊन विशेष स्वागत करण्यात आले.
सदर सभेला गावातील पालक, ग्रामस्थ, बालके तसेच किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अंगणवाडी मदतनीस सान्वी सुमित कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
अंगणवाडी केंद्र शिरगांव मयेकरवाडी येथे सेवा संकल्प व पोषण माह अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
Leave a Comment
