मजगांवची लेक डॉ. अमीना इब्जी ठरली कुटुंबातील पहिली महिला MBBS डॉक्टर!

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रत्नागिरीच्या मजगांव येथील सुकन्या डॉ. अमीना अब्दुल मजीद इब्जी यांनी वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. मुंबईतील प्रतिष्ठित MGM मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण करून, इब्जी कुटुंबातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. त्यांच्या या यशाने केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण मजगांव गावाचे नाव कोकणात उंचावले आहे.


शैक्षणिक वारसा आणि जिद्द
इब्जी कुटुंब हे शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणारे कुटुंब म्हणून परिचित आहे. अमीना यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अब्दुल्ला इब्जी यांनी यापूर्वीच MD पदवी मिळवली असून ते सध्या DM च्या उच्च शिक्षणासाठी सज्ज आहेत. आता बहीण अमीना यांनीही डॉक्टरकीची पदवी मिळवल्यामुळे हे कुटुंब आता रुग्णसेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.


कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कार
या प्रवासाबद्दल बोलताना अमीना यांनी आपल्या आई-वडिलांचे, म्हणजेच कैसरबेगम आणि अब्दुल मजीद इब्जी यांच्या खंबीर पाठबळाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. आत्या फरीदा हकीम, काका अब्दुल वहाब हकीम आणि आजोबा दाऊद हमदुले यांच्या मार्गदर्शनाने व संस्कारांमुळे हे यश संपादन करता आले, असे अमीना यांनी सांगितले. आपली ही यशोगाथा त्यांनी आपले आजी-आजोबा पै. चांदबी इब्जी आणि पै. महमूद इब्जी यांना समर्पित केली आहे.


मजगावात जल्लोष आणि मान्यवरांची उपस्थिती
अमीना यांच्या ऐतिहासिक यशाबद्दल मजगावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या गौरव सोहळ्याला मजगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक फय्याज मुकादम, माजी उपसरपंच शरीफ इब्जी, सामाजिक कार्यकर्ते एजाज इब्जी, माजी विस्तार अधिकारी सलीम इब्जी, मुख्तार इब्जी, पोल्ट्री उद्योजक कमाल इब्जी, आदर्श शिक्षक आसिफ इब्जी, डॉ. अब्दुल्ला इब्जी आणि वहिणी डॉ. खदीजा इब्जी यांच्यासह आजोबा दाऊद हमदुले आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. अमीना इब्जी यांचे हे यश केवळ इब्जी कुटुंबासाठीच नव्हे, तर कोकणातील सर्वच मुलींसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *