रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरामुळे एका गरजू संस्थेला हक्काचा आधार मिळाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे कार्यरत असलेल्या ‘माहेर’ संस्थेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीची गरज असल्याचा मेसेज व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला होता. या मेसेजची तातडीने दखल घेत मजगाव येथील प्रसिद्ध ‘एहसास वेल्फेअर ट्रस्ट’च्या पदाधिकाऱ्यांनी थेट संस्थेला भेट देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. एहसास ट्रस्टतर्फे माहेर संस्थेला २०,००० रुपयांचा मदत निधी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला.
व्हॉट्सॲप ग्रुप्सवर माहेर संस्थेच्या मदतीचे आवाहन करणारा मेसेज फिरत होता. हा मेसेज एहसास वेल्फेअर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी निवळी येथील माहेर संस्थेच्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली. तेथील प्रकल्पप्रमुख सुनील कांबळे यांच्याशी चर्चा करून संस्थेच्या अडचणी आणि विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजेच्या साहित्याची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या भावनेतून ट्रस्टने जागेवरच २० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
याप्रसंगी एहसास वेल्फेअर ट्रस्टचे पदाधिकारी शुहेब नाकाडे, इम्तियाज नाकाडे, महमूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इबजी आणि मजगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक फैयाज मुकादम प्रामुख्याने उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमासाठी एहसास वेल्फेअर ट्रस्टचे तन्वीर काझी, तसेच रफिक काझी, मुझफ्फर मुकादम, रियाझ मुकादम, शाहिद सावकार, बासित इबजी, रफिक मुकादम, अल्ताफ सोलकर, आबीदअली काझी आणि बशीर पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मजगाव येथील एहसास वेल्फेअर ट्रस्ट नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिली आहे. गरजू व्यक्तींच्या आजारपणाचा खर्च असो वा गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, एहसास ट्रस्ट नेहमीच हक्काचा आधार बनून पाठीशी उभी राहते, अशा भावना याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या. एहसास ट्रस्टच्या या संवेदनशीलतेचे आणि तातडीने केलेल्या मदतीचे रत्नागिरीत सर्वत्र कौतुक होत आहे.
निवळी येथील ‘माहेर’ संस्थेला मजगावच्या ‘एहसास ट्रस्ट’चा मदतीचा हात; २० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द
Leave a Comment
