मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुदतवाढ देण्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची विनंती आयोगाने मान्य केली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घरभेटी घेऊन मतदार पडताळणीची मोहीम राबवतील. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि आवश्यक पुनर्रचना देखील पूर्ण केली जाणार आहे.
१७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा हरकती नोंदविण्यासाठी अर्ज करता येणार आहेत.
दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर सर्व आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पात्र नागरिकांना निर्धारित कालावधीत आवश्यक गणना प्रपत्र भरून मतदार यादीत नाव समाविष्ट किंवा दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण ( SIR ) करिता भारत निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ
Leave a Comment
