कोकणची कन्या लंडनमध्ये चमकली! दापोलीच्या नादिया रुमाणेला युकेचा प्रतिष्ठित ‘आउटरीच ॲम्बेसेडर पुरस्कार’

Shabbir Vasta
1 Min Read

दापोली: कोकणातील गुणवत्तेने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे! दापोली तालुक्यातील पंचनदी कोलथरे येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सौदी अरेबियातील अल खोबर येथे वास्तव्यास असणाऱ्या रियाझ रुमाणे आणि शफीका रुमाणे यांची कन्या नादिया रुमाणे हिला युनायटेड किंगडममधील (लंडन) नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरतर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा ‘आउटरीच ॲम्बेसेडर पुरस्कार’ (Outreach Ambassador Award) देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

​नादियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे पालक, नातेवाईक आणि संपूर्ण कोकणवासीयांकडून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

आईच्या पावलावर पाऊल ठेवून जुळ्या भगिनींची गरुडझेप:

या यशाची पार्श्वभूमी अत्यंत प्रेरणादायी आहे. रियाझ रुमाणे यांच्या नादा आणि नादिया या जुळ्या मुली युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरमधून ‘अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन’ या विषयात बीए (ऑनर्स) पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. या दोन्ही भगिनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उत्तम प्रगती करत असून बालशिक्षण, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन आणि आधुनिक शिक्षण पद्धतींमध्ये त्यांना विशेष रस आहे.

​त्यांची आई शफीका रुमाणे (मूळ रा. देसाई मोहल्ला, चिपळूण) या गेल्या १५ वर्षांपासून अल खोबर, दम्माम आणि बहरीन भागात नर्सरी आणि किंडरगार्टनचा यशस्वी व्यवसाय चालवत आहेत. आईच्या याच पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुली शैक्षणिक क्षेत्रात पुढे जात असून त्यांनी थेट लंडनमध्ये कोकणाचे नाव उज्ज्वल केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *