नगरपरिषद नक्की कोणाची? शिवसेनेची की भाजपची? पालकमंत्र्यांचा आदेश धाब्यावर; २४ विरुद्ध ५ चा अजब सामना!

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:  रत्नागिरी नगरपरिषदेत ,शिवसेनेचे
(शिंदे गट) पूर्ण बहुमत असतानाही, चक्क भाजपचे ५ नगरसेवक शिवसेनेच्या २४ जणांच्या सैन्यावर भारी पडताना दिसत आहेत. सध्याचं चित्र पाहता, ‘नगरपरिषद नक्की कोणाची? शिवसेनेची की भाजपची?’ असा पेच सर्वसामान्यांना पडला आहे.
     काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेत उपनगराध्यक्षांना झालेल्या शिवीगाळ प्रकरणामुळे राजकारण तापलं आहे. या वादावर पडदा टाकण्यासाठी खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्व नगरसेवकांचे कान टोचले होते. “चौकशा थांबवा, वादात पडू नका, आपापल्या वार्डात जा आणि विकासकामं करा. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, पुढच्या वेळीही निवडून यायचं असेल तर कामाला लागा,” असा कडक सल्ला पालकमंत्र्यांनी दिला होता.
     पालकमंत्र्यांनी ‘शांती’ राखण्याचे आदेश दिलेले असतानाही, भाजपच्या नगरसेवकांनी मात्र आक्रमक पवित्रा सोडलेला नाही. पालकमंत्र्यांच्या शब्दाला मान न देता, उलट अधिकाऱ्यांनीच शिवीगाळ केल्याचा आरोप करत भाजप शिष्टमंडळाने सोमवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि अधिकृत निवेदन सादर केलं.
      रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि २४ नगरसेवक असं भक्कम संख्याबळ आहे. असं असूनही, केवळ ५ नगरसेवक असलेल्या भाजपने संपूर्ण प्रशासनाला आणि सत्तेला आपल्या तालावर नाचवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
     जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजपच्या वतीने महिला जिल्हा मोर्चा अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे,शहराध्यक्ष दादा ढेकणे,उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर,गटनेते राजू तोडणकर,नगरसेवक नितीन जाधव, सौ. मानसी करमरकर, सौ. सुप्रिया रसाळ,संदीप (बाबू) सुर्वे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
      बहुमत शिवसेनेकडे पण वरचष्मा भाजपचा, अशा विचित्र परिस्थितीत रत्नागिरीचं राजकारण अडकलं आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून भाजपने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने आता शिवसेना आणि भाजपमधील ‘युती’मध्ये स्थानिक पातळीवर मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे.
      या वादावर आता पालकमंत्री उदय सामंत नेमकी काय भूमिका घेतात आणि नगरपरिषदेचा हा अंतर्गत कलगीतुरा विकासकामांवर काय परिणाम करतो, हे पाहणं रंजक ठरेल.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *