रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी: शीळ धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा; तूर्तास पाणी कपात नाही

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:
कडाक्याच्या उन्हामुळे राज्याच्या अनेक भागांत पाणीटंचाईचे सावट असताना रत्नागिरी शहरासाठी मात्र एक अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, सद्यस्थितीत शहरावर कोणतेही पाणी कपातीचे संकट नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
     पाणी सभापती निमेश नायर यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीनुसार, १५ मे रोजी शीळ धरणाची पाणी पातळी ११२.५५ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणामध्ये सध्या ०.९०३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे ९०३ एमएलडी** पाणीसाठा शिल्लक आहे.
     वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि दैनंदिन उपसा याचा विचार करता, दररोज २५ एमएलडी पाण्याचा वापर गृहीत धरला तरी हा साठा पुढील ३५ दिवस पुरणार आहे. म्हणजेच साधारण २० जूनपर्यंत शहराची पाण्याची गरज या साठ्यातून पूर्ण होऊ शकते.
     मे महिन्याच्या अखेरीस अनेकदा पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात, मात्र यंदा धरणातील साठा पाहता प्रशासनाने तूर्तास कोणतीही पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होईपर्यंत म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा पाणीसाठा पुरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे रत्नागिरीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
     धरणातील पाणीसाठ्या बाबतचे सर्व संभ्रम आता दूर झाले आहेत. मात्र, तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन पाणी सभापतींनी यावेळी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *