रत्नागिरी : युवासेनेने रत्नागिरीतील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
सत्ताधारी गटाकडून ‘बिनविरोध’ निवडणुकीचे खोटे आश्वासन देऊन ग्रामस्थांवर मानसिक आणि राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.गावच्या विकासाचे कारण पुढे करून निवडणुकीची प्रक्रिया दाबली जात असून, हा प्रकार लोकशाहीच्या मूळ तत्त्वांचा आणि मतदानाच्या अधिकाराचा अपमान असल्याचे प्रसाद सावंत यांनी म्हटले आहे.
बिनविरोध निवडणुकीचा मुख्य हेतू हा सत्तेचे केंद्रीकरण करणे हा आहे, ज्यामुळे गावातील सुशिक्षित तरुण आणि नवीन विचारांच्या कार्यकर्त्यांची राजकीय गळचेपी केली जात आहे.
जर कोणीही ग्रामस्थांना धमकावण्याचा प्रयत्न केला, तर युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल आणि ही हुकूमशाही मोडून काढेल, असा स्पष्ट इशारा जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे.
युवासेनेची भूमिका ही आहे की गाव ही कोणाचीही जहागीर नसून, प्रत्येक नागरिकाला कोणत्याही दबावाशिवाय मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुका: युवासेनेचा आक्रमक इशारा
Leave a Comment
