रत्नागिरी:
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत वादळी ठरली. शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
सभेत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय:
विद्यार्थ्यांची सुरक्षा: शाळा आणि कॉलेज परिसरातील अनधिकृत जाहिरात फलक विद्यार्थ्यांच्या जिवासाठी धोकादायक ठरत असल्याने, ते तातडीने हटवण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.
फगरवठार संरक्षक भिंत: फगरवठार येथील भिंत कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ठेकेदाराने स्वखर्चाने ती भिंत पुन्हा बांधून द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
राम नाका अतिक्रमण: नगरसेवक केतन शेट्ये यांनी राम नाका परिसरातील स्वस्तिक हॉस्पिटलजवळील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. पालिकेच्या मुख्य गटारीवर आणि रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अतिक्रमण आणि स्वच्छता: शहरातील भाजी, फळ आणि चिकन विक्रेत्यांचे परवाने तपासले जाणार असून, अस्वच्छता पसरवणाऱ्यांना कडक नोटिसा बजावण्यात येतील. बाजार फी वसुलीत विक्रेत्यांकडून ८ महिन्यांची रक्कम पूर्ण भरून घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.
विद्युत खांबांचा वापर: नगरसेवक सौरभ मळुष्टे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर, शहरातील वीज खांबांचा वापर करून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या इंटरनेट आणि केबल कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे ठरले. तसेच, अनधिकृत फलक हटवण्याचे आदेश नगरसेवक निमेश नायर यांच्या मागणीनुसार दिले गेले.
जलस्त्रोत संवर्धन: नगरसेविका वैभवी खेडेकर यांच्या प्रस्तावानुसार, शहरातील मालको विहीर आणि तलावांच्या स्वच्छतेसह सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच उघड्या विहिरींना संरक्षक कठडे बांधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रभागातील कामांवरून नाराजी:
सभेच्या शेवटी, स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता कामांचे नारळ फोडले जात असल्याचा आरोप नगरसेविका वर्षा ढेकणे आणि अमित पिलणकर यांनी केला. तसेच नगरसेवक केतन शेट्ये व अमित पिलणकर यांनी आपल्या प्रभागातील कामांना प्रशासनाकडून बगल दिली जात असल्याचा आरोप करत, सर्व नगरसेवकांना समान वागणूक मिळावी, अशी जोरदार मागणी केली.
रत्नागिरी नगर परिषदेची सभा गाजली; विविध विकासकामांवरून नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा
Leave a Comment
