रत्नागिरी:
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, रत्नागिरी-१ अंतर्गत बीट पावस-१ आणि बीट पावस-२ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत पावस (ता. जि. रत्नागिरी) येथे ‘पोषण पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ‘खेळ जत्रा’ आणि ‘गंमत गोष्टी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पावस गट सदस्य मा. श्री. महेंद्रजी मांडवकर, पंचायत समिती पावस गण सदस्य मा. श्री. नामदेवजी कोकरे आणि गावखडी गणाच्या पंचायत समिती सदस्या मा. सौ. स्वाती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. केदार चव्हाण यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रकल्पाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. बीट पर्यवेक्षिका सौ. रूपाली शेटये आणि सौ. अर्पिता सावंत यांनी उपक्रमाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. प्रथम एज्युकेशन रत्नागिरीच्या जिल्हा समन्वयक सौ. दीपिका मयेकर यांनी ‘नवचेतना’ व ‘आधारशीला’ उपक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तर सखी वन स्टॉप सेंटरच्या समन्वयक सौ. सुप्रिया शितप यांनी त्यांच्या केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
पोषण मूल्यांबाबत पालकांचे प्रबोधन करण्यात आले. वृद्धिपत्रकाद्वारे सामाजिक लेखापरीक्षण पार पडले. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी खापरी लंगडी, दोरी उड्या, लगोरी यांसारख्या पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
रानभाज्या व स्थानिक फळांचे प्रदर्शन, विविध पाककृती, टाकाऊपासून टिकाऊ खेळणी आणि स्पर्शज्ञान व बौद्धिक विकासावर आधारित खेळांचे सादरीकरण करण्यात आले.पावस शिंदेवाडी अंगणवाडी कार्यक्षेत्रातील माता गटांनी ‘आधारशीला’ व ‘नवचेतना’ अंतर्गत आपल्या मुलांसोबत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. महेंद्र मांडवकर यांच्या हस्ते उपस्थित बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच, सिव्हिल इंजिनिअर व सामाजिक कार्यकर्ते श्री. विनायक भाटकर यांच्या वतीने सर्व उपस्थित लाभार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, बालके आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. केदार चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पर्यवेक्षिका व सेविकांचे विशेष कौतुक केले.

