मुंबई:
राज्यातील मच्छिमारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, राज्यातील मासेमारी बंदी कालावधीत १५ दिवसांची वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यापूर्वी राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६१ दिवसांचा होता. आता नवीन निर्णयानुसार, यात १५ दिवसांची वाढ करण्यात आली असून, मासेमारी बंदीचा कालावधी आता १ जून ते १५ ऑगस्ट असा असेल. यामुळे एकूण बंदीचा कालावधी ७६ दिवसांचा असणार आहे.
मासेमारी बंदीच्या कालावधीत वाढ झाल्यामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळणार आहे. याचा थेट फायदा सागरी जैवसंपत्तीच्या संवर्धनासाठी होणार आहे. भविष्यात मच्छिमारांना माशांचे उत्पादन अधिक प्रमाणात उपलब्ध होऊन, त्याचा सकारात्मक परिणाम मत्स्यव्यवसायावर होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या मागणीसाठी राज्यातील विविध मच्छिमार सहकारी संस्था, संघटना आणि प्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच, या विषयाला व्यापक प्रसिद्धी देऊन मच्छिमारांच्या मागणीला वाचा फोडल्याबद्दल समस्त मच्छिमार समाजातर्फे माननीय मंत्री महोदय आणि सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
मासेमारी बंदी कालावधीत १५ दिवसांची वाढ; मच्छिमारांच्या मागणीला यश
Leave a Comment
