हातखंबा निकालाचा ‘धूर’ अजूनही हवेत; विजयी जल्लोषातून घरासमोर राडा, परशुराम कदमांचा संताप!

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या हातखंखा जिल्हा परिषद गटात निवडणूक निकालानंतर कमालीचे वातावरण तापले आहे. अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या घरासमोर विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याने दोन गटांत ‘राडा’ झाला. जिल्ह्यात मिरवणुकांवर बंदी असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोमवारी जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी पार पडली. निकाल जाहीर झाल्यानंतर हातखंबा गटातील विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. हा जल्लोष करत असताना कार्यकर्ते मुद्दाम परशुराम कदम यांच्या घरासमोर आले. तिथे मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून आणि नारळ फोडून त्यांनी घोषणाबाजी केली.

एवढ्यावरच न थांबता, परशुराम कदम यांच्या घराशेजारील जमिनीचा दगडी बांध देखील फोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कृत्यामुळे परिसरात एकाएकी खळबळ उडाली आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वातावरणात कमालीचा तणाव निर्माण झाला.

या प्रकारानंतर परशुराम कदम यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की,
“निवडणुका झाल्या, तुम्ही जिंकलात, त्याबद्दल हरकत नाही. पण अशा प्रकारे पराभूत उमेदवाराच्या वैयक्तिक घरावर येऊन त्रास देणे, फटाके फोडणे आणि घराचे नुकसान करणे हा कोणता प्रकार आहे? हा निवळ सूडबुद्धीने केलेला त्रास आहे असे ते म्हणाले.

जिल्ह्यात सध्या प्रतिबंधात्मक आदेश लागू असून कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका किंवा गर्दी करण्यास बंदी आहे. तरीही हातखंबा येथे अशा प्रकारे मोठ्या संख्येने जमून फटाके फोडल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी रवाना झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *