रत्नागिरीकरांच्या समस्या सुटणार! शिवसेना (UBT) शिष्टमंडळाने घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट; मुलभूत सुविधांबाबत सकारात्मक चर्चा

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:
शहरातील नागरी समस्यांच्या विळख्यातून जनतेला मुक्त करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आता आक्रमक झाला आहे. रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरावस्था, पथदिपांचा (स्ट्रीट लाईट) अभाव आणि स्वच्छतेचा बोजवारा यांसारख्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या एका विशेष शिष्टमंडळाने रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली.

या बैठकीत केवळ चर्चाच झाली नाही, तर शिष्टमंडळाने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच मुख्याधिकाऱ्यांसमोर वाचला. प्रामुख्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती , बंद असलेले स्ट्रीट लाईट्स सुरू करणे , शहरातील स्वच्छतेचे नियोजन या विषयांवर भर देण्यात आला.

मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जाईल आणि योग्य उपाययोजना राबवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नगर प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हे शिष्टमंडळ शिवानी मिहीर माने आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गेले होते. यावेळी नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर,सुफियान जयगडकर, नितीन तळेकर यांच्यासह शहर संघटक आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या मुलभूत हक्कांसाठी शिवसेना (UBT) सदैव तत्पर असल्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *