रत्नागिरी: रत्नागिरीच्या प्रगतीमध्ये आज एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरी विमानतळाच्या ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या तीन महिन्यांत या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित या विशेष सोहळ्यात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी रत्नागिरीच्या भविष्यातील विकासाचे व्हिजन मांडले.
भूसंपादनाच्या अडचणी दूर करण्यासाठी १० ते १५ कोटींचा निधी दिला जाणार असून, ३ महिन्यांत रत्नागिरी विमानतळ प्रवाशांसाठी खुले होणार आहे. रत्नागिरीत ‘ताज’, ‘ओबेरॉय’ किंवा ‘हयात’ सारख्या नामांकित पंचतारांकित हॉटेल्स आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासह वन विभागात ‘ॲडव्हेंचर पार्क’ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणारे ‘ट्री-हाऊस रेस्टॉरंट’ उभारले जाणार आहे. विमानतळ सुरू झाल्यामुळे आपला जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि काजू थेट परदेशात निर्यात करणे सोपे होणार आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. विमानतळाच्या परिसरात महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक महिलांना हक्काचे बाजारपेठ मिळेल.
या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, MADC चे उपाध्यक्ष दीपक कपूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, आयसीजीएएसचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि उद्योजक उपस्थित होते.
“मी नवी मुंबई आणि चिपी विमानतळ सुरू करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतो. आता रत्नागिरी विमानतळ सुरू होत असल्याचा मला अभिमान आहे. रत्नागिरीला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,” असे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक यांनी विमान वाहतुकीची सुरक्षितता राखण्यासाठी विमानतळ परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि पक्षांपासून होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
