चिपळूणमध्ये पुराचे सावट: वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन सतर्क

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरावर पुन्हा एकदा पुराचे सावट निर्माण झाले आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून, रविवारी नदीचे पाणी शहरातील बाजार पुलापर्यंत पोहोचले आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने सतर्कतेचा इशारा दिला असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील चिंचनाका, भेंडी नाका, अश्वरूढ शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि नाईक कंपनी यांसारख्या सखल भागांत पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नदीची पातळी आणखी वाढल्यास बाजारपेठेसह इतर सखल भागांत पाणी शिरण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

महसूल, नगरपालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत.नदीकाठच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, गरजेनुसार पुढील उपाययोजना केल्या जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण नदीकाठावर किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चिपळूणमध्ये पुराचा धोका अद्याप कायम असून, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *