रत्नागिरी:
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या ‘पक्षद्रोहाची’ गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांची शिवसेनेतून (ठाकरे गट) तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात आल्याची अधिकृत माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे.
कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाळ माने यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनात अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
विशेष म्हणजे, हा अर्ज मागे घेताना ते सत्ताधारी महायुतीचे नेते तथा भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत उपस्थित होते. या अनपेक्षित आणि नाट्यमय माघारीमुळे महाविकास आघाडीची मोठी नाचक्की झाली आहे. परिणामी, महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाळ माने यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातामध्ये मशाल घेतली होती. पक्षानेही त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत, उपनेतेपद दिले आणि थेट विधान परिषदेची मोठी उमेदवारी दिली होती. पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ (AB Form) घेऊनही ऐन रणमैदानात विरोधकांशी हातमिळवणी करत फितुरी केल्याचा तीव्र राग शिवसैनिकांमध्ये आणि पक्षश्रेष्ठींमध्ये आहे. पक्षाला पूर्णपणे अंधारात ठेवून घेतलेल्या या निर्णयाला ‘पक्षद्रोह’ मानून उद्धव ठाकरेंनी थेट आदेश काढत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या मोठ्या राजकीय भूकंपामुळे कोकणच्या, विशेषतः रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. बाळ माने यांच्या या धक्कादायक पाऊलामुळे महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली असून, महायुतीने मात्र येथे मोठा राजकीय डाव साधल्याचे बोलले जात आहे.
कोकण विधान परिषद निवडणूक: ऐन रणांगणात माघार घेणारे बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी! पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची धडक कारवाई
Leave a Comment
