रत्नागिरी: शहराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरी समस्यांवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा कमालीची गाजली. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा सभागृहात पार पडलेल्या या सभेत, रस्ता रुंदीकरणा पासून ते कचरा व्यवस्थापना पर्यंतच्या अनेक प्रलंबित विषयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
समुद्राला प्रदूषणापासून वाचवणार: सांडपाणी प्रक्रियेसाठी नवा प्लॅन
शहराचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट समुद्रात जात असल्याबद्दल सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. यावर उपाय म्हणून स्वतंत्र सांडपाणी पाईपलाईन टाकण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय अधिकारी मयूर बेहेरे यांनी स्पष्ट केले की, यासाठी १४ नाले पॉईंट्स निश्चित करण्यात आले आहेत. मत्स्योद्योग आणि रासायनिक सांडपाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची आग्रही मागणी नगरसेवक राजीव कीर आणि वैभवी खेडेकर यांनी केली.
रस्ता रुंदीकरण आणि ‘टीडीआर’चा मोबदला
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्यांची जागा या रुंदीकरणात जाणार आहे, त्या जागामालकांना इतर ठिकाणी टीडीआर (TDR) स्वरूपात मोबदला दिला जाणार आहे, ज्यामुळे भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची ‘नजर’
शहरात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रतिबंधक फलक लावले जातील.
कॅमेऱ्यातील दृश्ये समाज माध्यमांवर प्रसारित करावीत, जेणेकरून कचरा टाकणाऱ्यांवर जरब बसेल. अशी महत्त्वपूर्ण सूचना सभापती निमेश नायर यांनी मांडली.
मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त
शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नावर आता कडक पावले उचलली जातील. गुरांना कोंडवाड्यात टाकण्यासाठी मक्तेदार नेमला जाणार असून, रस्त्यावरील गुरांना खाद्य घालणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मांडवी किनाऱ्यावर ‘सोलर’चा झगमगाट
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून मांडवी समुद्रकिनारी सोलर लाईट्स बसवण्यात येणार आहेत. या लाईट्सच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि देखभालीची जबाबदारी नगर परिषदेने घ्यावी, अशी मागणी नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी केली.
सभेतील इतर महत्त्वाचे मुद्दे:
* उत्पन्न वाढीवर भर: नगर परिषदेची सर्व सभागृहे खासगी तत्वावर चालवण्यास देण्यावर चर्चा झाली, मात्र त्यांचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे असावे असे स्मितल पावसकर यांनी सुचवले.
* ट्रक टर्मिनल: साळवी स्टॉप येथील ट्रक पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत पार्किंग व्यवस्था पाहण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
* स्वच्छतेचा मक्ता: आठवडा बाजारानंतर होणारी अस्वच्छता दूर करण्याची जबाबदारी संबंधित मक्तेदाराचीच असेल, यात कसूर केल्यास सक्तीची कारवाई केली जाईल.
रत्नागिरी नगर परिषदेने या सभेतून केवळ समस्याच मांडल्या नाहीत, तर त्यावर ठोस उपाययोजना करून शहराच्या प्रगतीची नवी दिशा निश्चित केली आहे.
रत्नागिरीच्या विकासाचा ‘नवा आराखडा’! सांडपाणी प्रक्रिया, रस्ता रुंदीकरण आणि स्वच्छतेबाबत नगर परिषदेत मोठे निर्णय
Leave a Comment
