रत्नागिरी:
कलर्स मराठीवरील बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये सध्या कोकणच्या मातीतील एक तेजस्वी तारा चमकतोय, ती म्हणजे तन्वी कोलते. आपल्या दमदार कामगिरीने आणि साध्या, सरळ स्वभावाने तन्वीने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर आता ती विजेतेपदाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
साखरप्याची लेक, महाराष्ट्राची लाडकी!
मूळची साखरपा (संगमेश्वर) येथील रहिवासी असलेल्या तन्वीने या आव्हानात्मक शोमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि धीरोदात्तपणे आपला खेळ मांडला आहे. प्रत्येक टास्कमध्ये दिसलेला तिचा आत्मविश्वास आणि कठीण प्रसंगात घेतलेली स्पष्ट भूमिका, यामुळे तिने अल्पावधीतच घराघरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रत्नागिरीच्या या गुणी मुलीने आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याची शान वाढवली आहे.
‘आपली मुलगी, आपला अभिमान’
तन्वी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून तिला विजयी करण्यासाठी रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून पाठींबा मिळत आहे. “आपली मुलगी, आपला अभिमान” अशा भावना व्यक्त करत सोशल मीडियावर तन्वीसाठी समर्थनाचे वारे वाहत आहेत. स्थानिक स्तरावरून तिला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
कोकणवासियांनो, साथ द्या!
कोकणच्या मातीतील एक कलाकार इतक्या मोठ्या व्यासपीठावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत आहे. त्यामुळे सर्व रत्नागिरीकर आणि कोकणवासियांनी तन्वीला जास्तीत जास्त मतदान करून विजेतेपदापर्यंत पोहोचवावे, अशी विनंती विविध स्तरांतून चाहत्यांकडून करण्यात येत आहे.
तन्वीला मिळणाऱ्या या प्रचंड प्रतिसादामुळे ती ‘बिग बॉस’च्या घराची महाविजेती ठरेल, असा ठाम विश्वास आता व्यक्त केला जात आहे.
साखरप्याची तन्वी ‘बिग बॉस मराठी’च्या फायनलमध्ये; रत्नागिरीकरांनो, आपल्या कन्येला साथ द्या!
Leave a Comment
