राजापूर तालुक्यातील नानार इंगळवाडी दुर्घटना: चौथ्या बालकाच्या शोधमोहिमेसाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न

Shabbir Vasta
2 Min Read

राजापूर (प्रतिनिधी):  राजापूर तालुक्यातील नानार इंगळवाडी येथे एकाच कुटुंबातील चार बालकांचा पाण्यात बुडून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेला चार दिवस लोटले आहेत. या अत्यंत दुर्दैवी घटनेत तीन बालकांचे मृतदेह हाती लागले असून, अद्याप बेपत्ता असलेल्या चौथ्या मुलीचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आज चौथ्या दिवशीही वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी तळ ठोकत शोधमोहिमेचे नियंत्रण केले.

चौथ्या दिवशीही शोधमोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात आले असून, राजापूरचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी दिवसभर घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले. तसेच पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मोहिमेचे नियंत्रण केले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचे जवान या कार्यात अहोरात्र तैनात आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान व विशेष पथकांची मदत

शोधकार्याला गती देण्यासाठी आज आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसराची कसून पाहणी करण्यात आली, तर कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने विस्तीर्ण खाडी परिसरात हवेतून शोध घेतला. याशिवाय मालवण आणि वेंगुर्ला येथून प्रशिक्षित कायाकिंग पथके आणि मोठ्या प्रमाणावर स्कूबा डायव्हर्स पाचारण करण्यात आले असून, खोल पाण्यात शोधमोहीम राबवली जात आहे.

मदतकार्यात राजकीय व सामाजिक सहभाग

या संकटकाळात शिवसेना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी सातत्याने उपस्थित राहून मदतकार्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. युवा नेत्या अपूर्वा सामंत यादेखील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, शोधकार्यासाठी शक्य ती सर्व मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

स्थानिकांमधून प्रशासनाच्या सुरुवातीच्या भूमिकेबद्दल नाराजी

दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले, तरी प्रशासनातील काही घटकांच्या सुरुवातीच्या ढिम्म कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये अजूनही रोष व नाराजी दिसून येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाची आवश्यक व प्रशिक्षित यंत्रणा पहिल्याच दिवशी वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र खंत व्यक्त केली जात आहे.

आपल्या कुटुंबातील निष्पाप लेकराचा शोध लवकरात लवकर लागावा आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी कुटुंबीय डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व त्रुटी दूर करत ही शोधमोहीम तातडीने पूर्ण करावी, अशीच आता संपूर्ण परिसरातून अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *