दणका! पाहणी दौरा फक्त नावापुरताच? रत्नागिरीत नगराध्यक्षांच्या पाहणीनंतरही गटारे तुंबलेलीच!

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी शहरातील तुंबणाऱ्या गटारांची साफसफाई मोहीम हाती घेतली होती. मात्र, या मोहिमेनंतर आणि थेट नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यानंतरही शहरातील अनेक भागांमध्ये गटारे तुंबलेलीच असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. प्रशासनाचा हा कारभार केवळ ‘कागदी घोडे’ आणि ‘दौऱ्यांचे फार्स’ ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


लोकप्रतिनिधींच्या दौऱ्याला प्रशासनाने पुसली पाने!
काही दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेवक बाबा नागवेकर, बंटी कीर तसेच नगर परिषदेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरातील विविध संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान गटारसफाई आणि नाल्यांच्या देखभालीसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी लोकप्रतिनिधींनी स्वतः निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र, या दौऱ्याला काही दिवस उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही आवश्यक ती कार्यवाही किंवा प्रत्यक्ष सफाई करण्यात आलेली नाही.


हिंदू कॉलनी भाजी मार्केट परिसरात पूरस्थितीची भीती
दरवर्षी पावसाळ्यात रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी येथील भाजी मार्केटजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यंदाही पावसाळा तोंडावर आला तरी येथील मुख्य गटार साफ न केल्याने ते पूर्णपणे तुंबलेले आहे. शहरातील अनेक ठिकाणी गटारांमध्ये प्लास्टिक कचरा, गाळ आणि इतर घाण तशीच साचून आहे. पाण्याचा निचरा होणारे मार्गच बंद असल्याने पहिल्याच मुसळधार पावसात या भागात पाणी तुंबून नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


केवळ पाहणी नको, प्रत्यक्ष काम करा; नागरिकांची मागणी
नगर परिषद प्रशासनाने केवळ पाहणीचे दौरे आणि बैठकांचे सोपस्कार पार न पाडता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून तातडीने स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात तुंबलेल्या गटारांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या (डेंग्यू, मलेरियाचा धोका) निर्माण होऊ शकतात, तसेच रस्त्यांवर पाणी आल्यास वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आता प्रशासन यावर खडबडून जागे होऊन तातडीने कारवाई करणार की रत्नागिरीकरांना यंदाही तुंबलेल्या पाण्याचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *