‘स्टार न्यूज़ कोकण’
संपादक : शब्बीर वस्ता
उपसंपादक : नजीरुद्दीन वस्ता
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध करिअर संधींची माहिती मिळावी आणि भविष्यातील करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने अजिजा दाऊद नाईक हायस्कूल, रत्नागिरी येथे शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी ‘आयडियल करिअर फेस्ट २०२६’ अंतर्गत ‘इंजिनिअरिंगसाठी योग्य दृष्टिकोन’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या वेळेत शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सहा संवादात्मक सत्रे आणि एक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. मुनीर शेख उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना उद्देशपूर्ण व सर्जनशील शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांची विशेष प्रशंसा केली.
या उपक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या अभियांत्रिकी क्षेत्रातील सहा मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमधून कु. अझफिन मोअज्जम गडकरी, इलेक्ट्रॉनिक्समधून श्री. साजिद जलाल पावसकर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्समधून कु. अझरा मन्सूर पटवी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगमधून कु. शुमाईलानाझ समीर सय्यद, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून श्री. गिलमान बशीर कोतवडेकर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून श्री. अनस मन्सूर नावडे यांचा समावेश होता. या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासातील अनुभव सांगून अभियांत्रिकी शिक्षणातील संधी व आव्हानांवर प्रकाश टाकला. यशस्वी करिअरसाठी मेहनत, योग्य नियोजन, सातत्य आणि चिकाटीची गरज अधोरेखित करत त्यांनी ‘आयडियल करिअर फेस्ट’चे महत्त्व विशद केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. समीर हिदायतुल्लाह गडबडे यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे (PPT Presentation) अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध संधी, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रकार, प्रवेश प्रक्रिया आणि या क्षेत्रातील आव्हाने याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक शिक्षिका सौ. सुमय्या जुवले, सौ. निहा सोलकर आणि सौ. सबिहा कापडी यांनी विशेष मेहनत घेतली. मुख्याध्यापकांनी त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच इयत्ता नववी व दहावीच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध शाखा आणि करिअरच्या वाटांची दिशा मिळण्यास मोलाची मदत झाली.



