नेवरे येथे ‘पोषण माह’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न

Shabbir Vasta
2 Min Read

नेवरे:
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प २, बिट मालगुंड १ च्या वतीने ग्रामपंचायत नेवरे येथे ‘पोषण माह’ कार्यक्रम आणि ‘सेवा संकल्प अभियान’ नुकतेच उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य, आहार आणि बालकांच्या मेंदूच्या विकासाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
     या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मा. राजेश साळवी, पंचायत समिती सदस्या मा. पूर्वा दुर्गवळी, बाल विकास प्रकल्प अधिकारी मा. संदीप पाटील, पर्यवेक्षिका मा. सलोनी दीपक कालेकर, तसेच ‘नवचेतना आधारशीला’ गटाच्या कोकण जिल्हा समन्वयक मा. दीपिका मयेकर उपस्थित होत्या. तसेच नेवरे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सी. एच. ओ. ठाकरे मॅडम, आरोग्य सेविका स्वाती कदम, अंगणवाडी सेविका, मदतनीस, किशोरवयीन मुली, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रम प्रसंगी मा. पूर्वा दुर्गवळी मॅडम व आरेकर मॅडम यांनी उपस्थितांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले. आरोग्य विभागाच्या निवेंडकर मॅडम यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले, तसेच या वेळी महिला व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
     ‘नवचेतना व आधारशीला’ उपक्रमाअंतर्गत बालकांच्या मेंदूचा विकास कसा होतो, याविषयी मा. दीपिका मयेकर यांनी सविस्तर माहिती दिली. तर पर्यवेक्षिका सलोनी कालेकर यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
पाककला व रांगोळीतून जनजागृती
पोषण माहाचे औचित्य साधून पाककला आणि आकर्षक रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून पोषणाचा संदेश देण्यात आला. ‘पोषण माह’ यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका घराघरांत जाऊन आरोग्य व आहाराबाबत मार्गदर्शन करत आहेत. अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रम राबवून या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेवरे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सागर मायंगडे यांनी केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *