मुंबई/प्रतिनिधी:
राजकारण बाजूला सारून आयुष्यभर केवळ आणि केवळ समाजकार्याला वाहून घेतलेले थोर उद्योगपती, निष्कलंक समाजसेवक आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय एम. डी. नाईक (M. D. Naik) यांच्या नावाचा मुंबईत घोर अवमान होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन परिसरातील एका महत्त्वाच्या मार्गाला स्वर्गीय एम. डी. नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र, आज याच थोर व्यक्तीच्या नामफलकाखाली कचऱ्याचे अस्ताव्यस्त साम्राज्य पसरले असून, या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि त्यांच्या चाहत्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गोरगरिबांचे कैवारी आणि ‘कोकण बँक’ कमिटीचे आधारस्तंभ
स्वर्गीय एम. डी. नाईक हे केवळ एक उद्योगपती नव्हते, तर ते गोरगरिबांच्या सुख-दुःखात धावून जाणारे एक हक्काचे नेतृत्व होते. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर काम केले होते. त्याचप्रमाणे, ‘कोकण बँक’ कमिटीवरही ते सलग अनेक वर्षे मोठ्या मताधिक्याने निवडून येत होते. त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवून जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण केले होते, तसेच मुस्लिम समाजाचे अध्यक्षपद भूषवून सामाजिक सलोखा राखण्यात मोठे योगदान दिले होते.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे थोर नेत्याचा अपमान!
ज्या नेत्याने आयुष्यभर लोकांचे प्रश्न सोडवले, समाजाचा विकास केला, आज त्यांच्याच नावाच्या पाठीखाली (बोर्डाखाली) कचरा टाकला जात आहे. कचऱ्याच्या विळख्यात सापडलेल्या या नामफलकाची अवस्था पाहून, “आपल्या थोर नेत्यांचा असा आदर करणे कितपत योग्य आहे?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. मुंबई महानगरपालिका (BMC) आणि या भागातील स्थानिक नगरसेवकांना हा कचरा आणि नेत्याचा होत असलेला अवमान दिसत नाही का? असा जाहीर प्रश्न विचारला जात आहे.
नगरसेवक आणि मुंबई महापालिकेने तातडीने लक्ष घालावे: नागरिकांची मागणी
या गंभीर प्रकारानंतर आता जनतेचा संयम सुटत चालला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात तात्काळ आणि गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. स्वर्गीय एम. डी. नाईक यांच्या नावाच्या पाठीखालचा तो संपूर्ण कचरा तात्काळ हटवून त्या जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांमधून दिला जात आहे.
मुंबईत थोर नेत्यांचा असा अवमान? स्वर्गीय एम. डी. नाईक यांच्या नामफलकाजवळ कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांमध्ये तीव्र संताप!
Leave a Comment
