मुंबईतील हत्याकांडाचा चिपळूणमध्ये थरार! जळालेल्या अवशेषांवरून पोलिसांनी लावला खुनाचा छडा; दोघे अटकेत

Shabbir Vasta
3 Min Read


चिपळूण :
मुंबईत घडलेल्या एका भीषण हत्याकांडाचे रहस्य तब्बल चार महिन्यांनंतर कोकणच्या मातीत उलगडले आहे. चिपळूण तालुक्यातील रामपूर-आवटेवाडी येथील एका आंब्याच्या बागेत सापडलेल्या मानवी अवशेषांनी पोलिसांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवले असून, चिपळूण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत दोन मुख्य संशयितांना जेरबंद केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
२८ मार्च रोजी रामपूर येथील डॉ. रावरणे यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांच्या बागेजवळील दरीत काहीतरी संशयास्पद जळत असून तिथे हाडांचे तुकडे विखुरलेले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि मेंगडे यांनी पथकासह तातडीने धाव घेतली. घटनास्थळाच्या पाहणीत हाडांच्या तुकड्यांसोबत एक अंगठी आणि इतर काही साहित्य सापडले. फॉरेन्सिक पथक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे मानवी अवशेष असल्याचे स्पष्ट करताच परिसरात खळबळ उडाली.
पोलिसी तपासाचे चक्र आणि उलगडा
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे समजले की, ज्या जागेवर हे अवशेष सापडले ती जागा विशाल विजय खोडदेकर याच्या मालकीची आहे. विशाल गेल्या चार महिन्यांपासून फरार होता आणि मुंबईतील मालाड पोलीसही त्याच्या शोधात होते. ही माहिती मिळताच तपासाची सुई विशालकडे वळली. ३१ मार्चच्या रात्री पोलिसांनी सापळा रचून विशालला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
हत्येचे धक्कादायक कारण: आर्थिक वाद!
चौकशीदरम्यान समोर आले की, मृत व्यक्तीचे नाव एजाज कुरेशी होते. आरोपी विशालची मैत्रीण जन्नतुलनिसा झिन्नत खानहिने कुरेशी यांना एका सदनिकेसाठी (फ्लॅट) डिपॉझिट म्हणून मोठी रक्कम दिली होती. मात्र, कुरेशी ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ करत होते. याच आर्थिक वादातून विशाल आणि जन्नतुलनिसा यांनी मुंबईत कुरेशी यांना बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्यासाठी रचला कट
हत्येनंतर दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका बॅगेत भरला आणि खासगी वाहनाने चिपळूणला आणला. विशालच्या मालकीच्या आंब्याच्या बागेत त्यांनी हा मृतदेह पुरला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी वन्य प्राण्यांनी ती बॅग उकरून बाहेर काढल्याचे विशालच्या लक्षात आले. घाबरलेल्या विशालने पुरावा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्या अवशेषांवर डिझेल ओतून ते जाळले.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
चिपळूण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत मुख्य आरोपी विशाल खोडदेकर याला ३१ मार्च रोजी, तर त्याची मैत्रीण जन्नतुलनिसा खान हिला १ एप्रिल रोजी अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि मुंबई पोलीस दलात मोठी चर्चा सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *