रत्नागिरी: १५ जुलै ‘जागतिक युवा कौशल्य दिना’चे औचित्य साधून रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला स्थानिक तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि स्किल ट्री कन्सल्टिंग संचलित कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.
६०० हून अधिक उमेदवारांची नोंदणी
या मेळाव्यासाठी तब्बल ६०० हून अधिक उमेदवारांनी आपली नोंदणी केली होती. सकाळपासूनच उमेदवारांनी मुलाखतीसाठी मोठी गर्दी केली होती. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात करिअरची नवी दिशा शोधणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील तरुणांसाठी हे मेळावे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.”
२० नामांकित कंपन्यांचा सहभाग
मेळाव्यात रत्नागिरीसह परिसरातील २० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेत उमेदवारांची निवड केली. विशेष म्हणजे, मेळाव्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कंपनी प्रतिनिधींनी आयोजकांच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.
यशस्वी वाटचाल
दिवसभर चाललेल्या निवड प्रक्रियेनंतर, २७ उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये थेट नियुक्ती करण्यात आली आहे, तर १३६ उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या यशानंतर उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि स्किल ट्री कन्सल्टिंग संचलित कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरीच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

