रत्नागिरी:
डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची नवी शक्कल लढवली आहे. सध्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एक अत्यंत धोकादायक प्रकार समोर येत असून, यामध्ये नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत आहे. या प्रकारापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.
नेमके काय घडते?
१. सायबर भामटे सर्वप्रथम एखाद्या व्यक्तीचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करतात.
२. हॅकर्स त्या व्यक्तीच्या ओळखीच्या लोकांना (मित्र, नातेवाईक) मेसेज पाठवून “मी सध्या अडचणीत आहे, मला मदतीची गरज आहे,” असे भासवतात.
३. या मेसेजसोबत एक संशयास्पद ‘पीडीएफ’ (PDF) फाईल पाठवली जाते.
४. जर समोरच्या व्यक्तीने घाईगडबडीत ती पीडीएफ ओपन केली, तर त्या मोबाईलचा ताबा हॅकर्सकडे जाऊ शकतो. यामुळे तुमच्या मोबाईलमधील सर्व वैयक्तिक डेटा चोरीला जाण्यासोबतच तुमचे बँक अकाउंट काही मिनिटांत रिकामे होऊ शकते.
अशी घ्या खबरदारी:
अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही पीडीएफ फाईलवर क्लिक करू नका.
तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास, त्यांना फोन करून खात्री केल्याशिवाय कोणतीही मदत करू नका किंवा फाईल उघडू नका.
व्हॉट्सॲपला ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ (Two-Step Verification) सुरू ठेवा.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत अशी फसवणूक झाली असेल, तर घाबरून न जाता तातडीने १९३० (1930) या नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. ज्यांचे पैसे गेले आहेत, त्यांनी त्वरित स्थानिक सायबर पोलीस ठाण्यात किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर रीतसर तक्रार नोंदवावी.
सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून इतरांनाही सुरक्षित करा.
