इंग्लंडमध्ये रत्नागिरीच्या सुपुत्राची कमाल! रोहित शर्माकडून मिळाली गोलंदाजीची संधी; मराठीत दिला यशाचा मंत्र

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी : क्रिकेटपटू म्हणून मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना भेटणे, हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. पण रत्नागिरीचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने हे स्वप्न केवळ सत्यातच उतरवले नाही, तर खुद्द ‘हिटमॅन’ रोहित शर्माला सलग पाच षटके गोलंदाजी करत त्याचे कौतुकही मिळवले.

अविस्मरणीय संधी आणि स्वप्नवत क्षण

अविराज सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत असून आपल्या दमदार कामगिरीने त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी रोहित शर्मा मिडलसेक्स कौंटीच्या मैदानावर येणार असल्याची माहिती मिळताच, अविराजने तेथे धाव घेतली. तिथे विंबल्डन क्लबचे चेअरमन सोहम यांच्या मदतीने त्याला रोहित शर्माला गोलंदाजी करण्याची अनपेक्षित संधी मिळाली.

रोहितला केले क्लीन बोल्ड!

सरावाच्या वेळी सुरुवातीला दडपणाखाली असलेल्या अविराजला रोहितने धीर दिला. त्यानंतर अविराजने लेगस्पिन गोलंदाजीचा असा काही मारा केला की, रोहित शर्मालाही त्रिफळाचीत (Clean Bowled) व्हावे लागले. त्यानंतर हसत रोहित म्हणाला, “आता यानंतर मी पुन्हा बाद होणार नाही,” आणि खरोखरच पुढील सरावात त्याने आपली विकेट सावरून धरली. मात्र, अविराजच्या अचूक गोलंदाजीचे रोहितने मनापासून कौतुक केले.

मराठीतील संवाद अन् यशाचा मंत्र

सरावानंतर रोहित आणि अविराज यांच्यातील संवाद अधिकच भावूक झाला. अविराज महाराष्ट्राचा असल्याचे समजताच रोहितने थेट मराठीत संवाद साधायला सुरुवात केली. रोहितने युवा क्रिकेटपटूंना यशाचा कानमंत्र देताना सांगितले की:

“फक्त चांगली लाइन-लेंथ टाकणे पुरेसे नाही. भारतात लाखो क्रिकेटपटू आहेत, गर्दीतून वेगळे दिसण्यासाठी तुमची कामगिरीच बोलली पाहिजे. मेहनतीला कोणताही पर्याय नाही, फक्त सातत्य ठेवा.”

वडिलांशी फोनवर बोलायची होती इच्छा…

अविराजने आपल्या वडिलांशी, अनिल गावडे यांच्याशी रोहितने फोनवर बोलावे अशी इच्छा व्यक्त केली होती. रोहितनेही मोठ्या मनाने होकार दिला, मात्र तांत्रिक अडचणीमुळे वडिलांशी संपर्क होऊ शकला नाही. तरीही, “काही हरकत नाही, पुढच्या वेळी नक्की बोलू,” असे म्हणत रोहितने दाखवलेला नम्रपणा अविराजच्या मनावर कायमचा कोरला गेला.

“रोहित शर्मासारख्या महान खेळाडूने खांद्यावर हात ठेवून दिलेले मार्गदर्शन हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे,” अशी भावना अविराज गावडेने व्यक्त केली आहे. रत्नागिरीच्या या लेकाने इंग्लंडच्या मातीत आपल्या जिद्दीने आणि कौशल्याने संपूर्ण कोकणचे नाव उंचावले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *