रत्नागिरीच्या ग्रामीण भागात ‘अंधारयुग’; साखरतरसह परिसरातील गावांमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी तालुक्यातील साखरतर तसेच कासारवेली, बसणी, काळबादेवी, म्हामूरवाडी आणि परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला आहे. दिवसातून तब्बल ८ ते १० तास वीज गायब राहत असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून, महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


प्रशासनाचे दुर्लक्ष; फोन उचलण्यासही टाळाटाळ
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर समस्येबाबत महावितरणच्या स्थानिक कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, स्थानिक वायरमन आणि विभागीय अभियंता नागरिकांचे फोन घेण्यासही टाळाटाळ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही महावितरणकडे वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती करण्यात आली आहे, मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.


विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी हवालदिल
सततच्या वीज खंडितीचा मोठा फटका शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. तसेच शेतीची कामे आणि स्थानिक छोट्या-मोठ्या व्यापारावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. अनेकदा ऐन कामाच्या वेळी वीज गेल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


आंदोलनाचा इशारा
महावितरणच्या या अनास्थेमुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. “येत्या काही दिवसांत वीजपुरवठा नियमित आणि अखंडित न झाल्यास, महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. आता तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *